Thursday, August 24, 2023

फॅसिझम

 प्रति संपादक लोकसत्ता,

सात एप्रिल 2023 च्या अंकात श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे केलेले भाषण वाचण्यात आले. आधुनिक सुधारणांचा पुरेपूर वापर करून भाषण केले हे कौतुकास्पद
त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याच शब्दात -- "२०१४ मध्ये फक्त सत्तांतर झाले नाही, तर आठशे वर्षांची गुलामगिरी संपून देशाच्या राजकारणात मूलभूत बदल घडला. बादशाही मानसिकते विरोधात शंखनाद करून नवा भारत घडवण्याची हाक आम्ही दिली."
हे आणि इतर सर्वच विधाने ऐकून वाचून आठवणी झाली ती श्री नरहर कुरुंदकर या प्रज्ञावान लेखकाची. त्यांचे "छाया प्रकाश" हे पुस्तक १९७९ साली प्रसिद्ध झाले. त्याला आणीबाणीची पार्श्वभूमी होती. पण आजही त्यातील प्रत्येक लेख तेवढाच खरा आहे. यात विशेष म्हणजे त्यातील "फॅसीझम, फॅसीझम, फॅसीझम" हा लेख.
त्यात ते म्हणतात " जोपर्यंत कोणत्याही पक्षाशी सोयीस्कर सोयरीकी करता येतात तोपर्यंत चिंताच नसते. जोपर्यंत जाती, धर्म व पैसा यशस्वीरितेने हाताळता येतो व विरोधी पक्षात फूट पाडता येते तोपर्यंत अडचण नसते. सत्ता हाती घेण्याची व सर्व मार्गाने सत्ता टिकवण्याची जिद्द म्हणजे फॅसीझम.... फॅसिस्टाना धर्म, परंपरा, संस्कृती, राष्ट्र यांच्या विषयी प्रेम नसते. गुंगी आणण्यासाठी ही मादक द्रव्ये चांगली आहेत इतकाच त्यांचा मुद्दा असतो...... इतरांवर गुलामगिरी लादणे हे फॅसीझमचे कायम वैशिष्ट्य आहे. पण हे "इतर" म्हणजे परराष्ट्रीय असले पाहिजेत अशी काही शर्त नाही..... फॅसीझम मध्ये ह्या जनतेला शासन जे जे करील, त्याला बिनशर्त पाठिंबा देण्याचा संपूर्ण हक्क असतो. कारण शासन जनतेचे प्रतिनिधी असते. जनतेचे प्रतिनिधी असणाऱ्या शासनाविरुद्ध बोलणारे हे जनतेचे शत्रू असतात. त्यामुळे जनतेच्या शत्रूंचा जर जनतेने नायनाट केला तर तो जनतेचा रास्त हक्क मानावा लागतो. ..... या जनतेला एक नेता लागतो. या नेत्यावर सारखे विश्वासाचे ठराव पास होत असतात. जनतेचा प्रतिनिधी पक्ष असतो. पक्षाचा प्रतिनिधी नेता असतो. आणि नेता हाच राष्ट्र असतो. जनतेला जनतेवर विश्वास व्यक्त करण्याचा हक्क नसतोच. म्हणून नेत्यावर विश्वास व्यक्त करणे याशिवाय दुसरे काही करणे शक्य नसते. तरीही वेळोवेळी सर्वांनी नेत्यावर विश्वास व्यक्त करावा अशी फॅसीझम मध्ये प्रथा आहे. "आमचा एकमेव नेता, आमचा महान नेता, आमचा अलौकिक नेता, फक्त तोच एक राष्ट्र तारू शकतो, तो म्हणजे राष्ट्र " अशी सगळी वाक्ये ठरलेली असतात. हा आमचा नेता, यापुढे त्याला काय म्हणायचे हे राष्ट्रानुसार ठरणार. पण "गेल्या हजार वर्षातील आमचा सर्वश्रेष्ठ नेता" हे बिरूद कायम राहते."
असा नेता एकाही विरोधी पक्षाकडे नसल्यामुळे त्यांना काहीही जमणार नाही. त्यामुळे २०२४च्या निवडणूकांचा निकाल उघड आहे. जय हो!!!

जयंत करंदीकर पुणे
९८२२४३९४९२

0 Comments:

Post a Comment

<< Home