Monday, May 13, 2024

भूगोलाचा इतिहास ११ मे २०२४

 माननीय श्री एल.के.कुलकर्णी,

आपले हे सदर शनिवारी लोकसत्ता मध्ये येते. अत्यंत वाचनीय असते. मी त्याचा नियमित वाचक आहे.

आजच्या (११/५/२४) अंकात आपण ऑर्थर कॉटन या इंग्रजाबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. खरंतर या सदरात आज आंध्र प्रदेशातील तांदूळ कोठाराची माहिती आहे. पण तेथील भूगोल आणि त्याचा इतिहास ह्यापेक्षा त्या इंग्रजाचे (फार) जास्त कौतुक आहे. 

     आंध्रातील एकूण २७ धरणापैकी २४ धरणे स्वतंत्र भारतात येथील तंत्रज्ञांनी बांधली. नागार्जुन सागर हे त्यापैकी एक. ह्या सर्व धरणांच्या कथा अत्यंत माहितीपूर्ण आणि सुरस आहेत.

          हा कृष्णा गोदावरी पट्टा किंवा त्रिभुज प्रदेश तसा समृद्धच. तो केवळ ह्या इंग्रजामुळे वैभवी झाला असे म्हणणे तेथील कष्टकऱ्यावर अन्यायकारक आहे. हा बंधारा बांधताना कित्येकानी जीव गमावला असणार, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असणार किंवा देशोधडीला लागली असणार. धरण क्षेत्रात असंख्य विस्थापितही असणार. ह्या अशा सामाजिक प्रश्नांचे त्यावेळी काय झाले, थोडक्यात त्याचा इतिहास, हे समजले असते तर बरे झाले असते. अर्थातच ह्या सदरात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नाही, आणि अपेक्षाही नाही. पण ओझरता उल्लेख योग्य ठरला असता. त्या असंख्य तेलगू कष्टकऱ्यांनीही तेथील भूगोलाचा इतिहास आपल्या कष्टाने बदलला आहे.

     तेथील भूगोलाचा परिचय झाला असता तर ते उचित ठरले असते. उदा: येथील कालव्यांचा आणि त्या त्रिभुजातील सतत पात्र बदलणाऱ्या नद्यांचा (प्रत्येक प्रवाहाला वेगळे नाव असू शकते.) एकमेकांशी परस्पर काय संबंध आहे आणि त्यांना व्यवहारात कसे आणले गेले आहे. ह्या ऐवजी त्या ऑर्थर कॉटनचेच कौतुक जास्त आहे. पण आपल्या बऱ्याच लेखात अशा इंग्रजांचे फार जास्त कौतुक वाचायला मिळते, जे कित्येक वेळा अनावश्यक वाटते. कमी झाले तर बरे.

           १९७० साली, स्वतंत्र भारतात, पुनर्निर्मित धौलेश्वरम बंधाऱ्याला ऑर्थर कॉटनचे नाव देणे हे गुलामी मानसिकतेचे लक्षण आहे. १८५२साली पूर्ण झालेल्या बंधाऱ्याच्या १०० वर्षांनी एका इंग्रजाचे नाव देणे ही ती गुलामगिरी. पुन्हा नव्याने बांधताना जबाबदारी उचलणाऱ्या एकाही प्रमुख अभियंत्याचे नावही कोणाला माहीत नसेल.

     आजच्या लेखात नेमकी अपेक्षा होती ती तेथील भूगोल आणि त्याचा इतिहास समजण्याची. पण ती पूर्ण झाली नाही. आत्तापर्यंतच्या अनेक लेखावरून एक नक्की आहे, भूगोलाच्या इतिहासाऐवजी अनेक इंग्रजांचे गुणगान वाचावे लागणार. स्वातंत्र्यानंतर अनेक वरच्या जातीच्या लोकांचे मत होते की इंग्रज बरा होता. हे असे लेख म्हणजे त्याचीच एक प्रकारची पुष्टी आहे. नक्कीच निषेधार्ह.

(पत्र लिहिण्यापूर्वी विकी मधून बरीच माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.)

जयंत करंदीकर 

पुणे 

0 Comments:

Post a Comment

<< Home