Wednesday, July 03, 2024

संविधान

 

संविधान

डॉक्टर श्रीरंजन आवटे poetshriranjan@gmail.com
संविधान भान हे अत्यंत महत्त्वाचे सदर आहे. यातून आम्हाला संविधानाबद्दल खूप सारी माहिती समजली.
मी सुरुवातीपासून हे सदर वाचत आहे. त्यासंबंधी काही विचार आपल्यासमोर:
१. या सदरातून "संविधान' या विषयावरील मूलभूत पण तितकीच मनोरंजक माहिती देत आहात. याबद्दल आपले आभार.
२. त्याचबरोबर हे संविधान अमलात आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली ह्याचेही विवेचन व्हावे.
३. या संविधानाचे लेखापरीक्षण केले तर काय स्थिती समोर येईल? असे लेखापरीक्षण प्रत्यक्षात करता येईल का? त्या आधारे संविधानात सुधारणा सुचविता येतील का?
४. संविधानात वापरलेले शब्द, संज्ञा, विचार यांचा कोश करण्यात आला आहे का? जेणेकरून माझ्यासारख्या सामान्य माणसाला "संविधान" समजून घेता येईल.
५. सरकारी खात्यात वरिष्ठ पातळीवर संविधानाचा अभ्यास केला जातो काय? संविधानाचा अभ्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा भाग करता येईल काय?
६. ह्या व अशा अनेक प्रश्नांना सामोरे गेल्याशिवाय आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी गणतंत्र होणार नाही.‌
७. माझ्या शंकेच्या समर्थनार्थ एक मुद्दा: शेवटून दुसऱ्या परिच्छेदात आपण असे लिहिता की "नवव्या अनुसूचीतील कायदे असोत व इतर कायदे असोत कोणताही कायदा हा न्यायालयाच्या चिकित्सेपपलीकडे असू शकत नाही" सध्याच्या संदर्भात याचा अर्थ वक्फ बोर्डाचा कायदा ही न्यायालयात चिकित्सेसाठी येऊ शकतो. हे खरे आहे का? असे नसल्याचा प्रचार करून भारतीयांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून हा प्रश्न. असे खोटी माहिती पसरविण्याचे अनेक प्रश्न आहेत. पण ते असो.
तसेच संविधान (भारतीय राज्यघटना) शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे हे घडते आहे.
जयंत करंदीकर पुणे

प्रमाण भाषा

 

प्रमाण भाषा

कु. सरोज चंदनवाले,
सप्रेम नमस्कार
कु. च्या ऐवजी "कुमारी" असे लिहायचे होते. पण नंतर लक्षात आले की सदर सदर (हाऊस ऑफ बांबू) बोली भाषेत आहे. म्हणून थांबलो. ते असो. श्रीमती यास्मिन शेख यांनी ९९ पार करून शंभरीत प्रवेश केला आहे. त्यांना माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या (मराठी भाषा प्रेमींच्या) शुभेच्छा कळवाव्यात. जीवेत शरद शतम!
आपले हे हसत खेळत लिहिलेले सदर खरंच छान असते. नक्कीच वाचले जाते.
आता ह्या वेळेचे सदर (शनिवार २२ जून २०२४). सर्वात खटकलेली गोष्ट, लेख प्रमाण भाषेत न लिहीता बोलीभाषेत लिहीला आहे.- तसे परिच्छेदात व्याकरणाची गणितासारखी भीती वाटण्याचे कारण सांगून तुम्ही स्वतःची सोडवणूक करून घेतली आहेत तरीही - हा लेख ज्यांच्यासाठी लिहिलेला आहे, त्यांच्या सन्मानार्थ‌ तरी (श्रीमती यास्मिन शेख) हा लेख प्रमाण भाषेत असायला हवा होता. उदा:
१. या शुभ्र चांदण्यासारख्या शीतल व्यक्तिमत्त्वाचं व्याकरणासारख्या रूक्ष आणि कंटाळवाण्या क्षेत्रात काय काम? असं अनेकांना वाटायचं -- या शुभ्र चांदण्यासारख्या शीतल व्यक्तिमत्त्वाचे व्याकरणासारख्या रूक्ष आणि कंटाळवाण्या क्षेत्रात काय काम? असे अनेकांना वाटायचे...
२. मुंबईच्या शीवमधील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी २८ वर्षे शिकवलं . -- मुंबईच्या शीवमधील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी २८ वर्षे शिकविले.
३. भाषेच्या सौष्ठवासाठी हयात घालवणाऱ्या या बाईंवर आपण सगळे मिळून मराठीचं जे काही भजं करतो आहे ते बघायची वेळ आली आहे. -- भाषेच्या सौष्ठवासाठी हयात घालवणाऱ्या या बाईंवर आपण सगळे मिळून मराठीचे जे काही भजं करतो आहे ते बघायची वेळ आली आहे.
आणखीनही चार-पाच उदाहरण आहेत. पण या कांही उदाहरणावरून माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल, असे मी गृहीत धरतो. आम्ही वाचक हे हलकेफुलके उपहासगर्भ सदर नक्की वाचतो. ते जर प्रमाण भाषेत लिहिलेले असेल तर ते अधिक सुंदर होईल. नाटक, कविता हे साहित्य प्रकार सोडले तर बाकी सर्व मुद्रित लेखन प्रमाणभाषेतच असायला पाहिजे. बोलीभाषा बोलण्यासाठी आहे, लिहिण्यासाठी (नाटक, कविता सोडून) नाही. प्रमाण पद्धतीने लेखन केल्याशिवाय प्रमाण भाषेचे सौंदर्य लक्षातच येणार नाही. हळूहळू प्रमाणभाषा विस्मृतीत जाऊ लागेल. प्रमाण भाषा म्हणजेच अभिजात भाषा. आणि मग बोली भाषेत लिहिल्या जाणाऱ्या भाषेला अभिजाततेचा दर्जा का द्यायचा? माऊलीनी ज्ञानेश्वरी बोलीभाषेत लिहिली असती तर काय झाले असते? पण हा असा वाचकांशी जवळीख (उगीचच) दाखविण्याचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही असे दिसते. उदा: .
१. आज रविवार (२३/६/२४) श्री. श्रीराम पवार या ख्यातनाम विश्लेषकांचा लेख बोली भाषेत म्हणजे (मात्रा कमी करून) लिहिलेला आहे. खरेतर त्यांचे लेख गंभीर विषयावर असते. त्यामुळे ते लेख प्रमाणभाषेतच लिहिले पाहिजेत.
२. प्रसिद्ध लेखक श्री राजेंद्र खेर यांनी आदरणीय कै. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या चरीत्रावर अप्रतिम कादंबरी लिहिली आहे. ती प्रकाशित होऊनही खूप वर्षे झाली आहेत. पण मी ती आता पुन्हा एकदा वाचली. हे सर्व लिखाण बोली भाषेत - जे मात्रा कमी करून- आहे. हे पुस्तक म्हणजे एक संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे त्यात प्रवाही पण प्रमाण भाषाच असली पाहिजे.
हल्ली हे असे लिखाण आणि अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर वाढत चाललेला आहे. प्रमाणभाषा नष्ट होण्याची पहिली पायरी म्हणता येईल. वर्तमानपत्रांचे मालक आणि संपादक मिळून हा ऱ्हास थांबवू शकतात .
माझ्या सारख्यांचे हे विचार अरण्य रुदन ठरू नयेत हीच इच्छा.
जयंत करंदीकर पुणे
(ज्या चुका आढळतील त्याबद्दल क्षमस्व. अधिकृत असा मराठी - मराठी शब्दकोश उपलब्ध नाही. असल्यास कळवावे. मी विकत घेईन.)